Tag Archives: पहिलं पत्र… तुझ्यासाठी!

पहिलं पत्र… तुझ्यासाठी!

प्रिय
तुझी आठवण झाली अन्‌ पत्र लिहण्याचे कारण ठरले. बऱ्याच दिवसांनी लेखणी हाती घेतली. आता लिहण्याची सवय तुटलीय. म्हणून थोडं अखडतंय. तरीही प्रयत्न करतोय. हल्ली सोशल मीडिया आल्यापासून आपलं बोलणं नित्याचच झालंय. अनेक दिवसांपासून मी माझ्या मनातलं जेव्हा केव्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा वेगळे विषय चर्चेला येतात आणि ते राहूनच जातं. म्हणूनच हा पत्रप्रपंच.
खरं तर मला हा अधिकार आहे की नाही, माहिती नाही. तरी मी तुला प्रिय म्हणालो. मैत्रीपूर्ण भावनेतून हा शब्द लिहलाय. मी यापूर्वी कधीच असे मैत्री पत्र लिहिलेले नाही. कदाचित हे पहिले पत्र . आपल्यात चांगली मैत्री आहे. नकळत एकमेकांना आपण भेटतो आणि एसएमएस, नेट चॅटींगही करतो. जोपर्यंत आपण एकत्र असतो, तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या मनाला स्पर्श करत असतो. तो मी आता पत्रांतून मांडू आणि सांगू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.
ज्या वेळी पहिली भेट झाली. तेव्हा ओळख नव्हती. पण, मनात इच्छा नसतानाही भेट घेतली. पुढे मैत्री होईल, अशी कोणतीही पाउलखूण नव्हती. पण, पुन्हा दोन महिण्यांनी भेट झाली. या दोन्ही भेटी तीन- चार मिनिटांच्या होत्या. आता पुन्हा भेट होऊ नये, याचाच प्रयत्न मी करीत होतो. कारण, मी मैत्री सहजासजहजी करीत नाही. जाणिवपूर्वक टाळतो, असेही म्हणायला हरकत नाही. मैत्री करताना प्रश्न पडतो की, कशासाठी आणि का? पण, मैत्री आपसूकच होऊन जाते आणि ती संवादातून फुलत गेली. दसरा- दिवाळी, माझा- तुझा वाढदिवस, नवीन वर्ष या दिवशी शुभेच्छाची देवाणघेवाण झाली. नव्या वर्षात मैत्रीने विश्वास संपादन केला. आपुलकी हृदयापर्यंत पोहोचली.

मानव हा संवादी आहे. तो बोलतो. आपल्या भावना दुस-याला सांगतो. म्हणजेच कुणाशीतरी शेअर करतो. शेअर केल्याने मनातील दु:ख, वेदना हलक्या होतात. तुझं- माझं रक्ताचं नातं नसलंतरी भावभावनांनी जुळलेलं नवे बंधन आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून जगण्यातला आनंद वेगळाच आहे. तुझल्यातली एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडली असेल ती म्हणजे तुझा हट्टीपणा .  एखादी गोष्ट तुला हवी असेल तर ती तू अक्षरशः भांडून मिळवते. एखादं लहान मूल चॉकलेटसाठी मागे लागतं तितक्याच आपुलकीनं तू लिहण्यासाठी हट्ट करते. म्हणूनच माझं थांबलेलं लिखाण पुन्हा शब्द बहरून येत आहे.
मगाशी तुझ्याशी बोलताना अनेक प्रश्न केले. मला बरं वाटतं होतं कि आपुलकीनं विचारपूस करीत होती. पण फोनवर काही उत्तरे देऊ शकलो नाही. गेल्या 10 वर्षापासून मी एका वेगळ्याच व्याधीने ग्रस्त होतो. ही व्याधी मनातच होती. सामाजिक भितीपोटी माझा संवादही हरवला होता. त्यामुळं मी कुणाशी फार जवळीक साधत नव्हतो. मुलींशी तर नाहीच नाही. कुणी माझ्याशी कुणी बोलायचा प्रयत्न केला, तर मी टाळायचो. मनातल्या मनात कमीपणा म्हणा की निरुत्साहीपणा. त्यामुळे मी खचलेला होतो. इतका खचलो की निराशेच्या खाईत गेलो. पुढे जगण्याचा मार्गही गवसत नव्हता. माझ्या व्याधीवर गेल्यावर्षीच (2016) उपचार झाला. तशी मोठी शस्त्रक्रियाच होती. दीर्घ विश्रांती घेतली. कौटुंबिक आधार होता. मित्रांचे प्रेम होते. चाहत्यांचे आशिर्वाद होते. सारंकाही बरं झालं. “दिल में दर्द और होठोंपे हंसी’ असंच खोटं जगणं सुरू होतं. उपचाराअंती बरा झाल्यापासून मी आनंदी जीवन जगतोय. जगण्यात आनंद शोधतोय. कामात एन्जॉय करतोय. मला भविष्य माहिती नाही. पण, जे उरलं सुरलं आयुष्य आहे, ते आशादायी जगायचं असंच ठरवलयं. हे तुला इतक्यासाठीच सांगण की, माझ्या वेदनांची आपुलकीच्या नात्याला थोडीफार जाण असावी.

जन्माला आलेला प्रत्येकजण मरणार आहे, हे अंतिम सत्य आहे. म्हणून मरण्याची भिती न बाळगता आयुष्य हसतखेळत जगण्याची ही धडपड आहे. नऊ-दहा वर्षांपूर्वीच त्याच भावनेतून कवितेच्या दोन ओळी लिहल्या होत्या.
“नाहीतरी मी मरणारच आहे,
मरण्यापूर्वी वाचून घेतो,
वाचता वाचता काही क्षण,
तुझ्यासाठीही जगून घेतो…..”

जेव्हा केव्हा एकटेपणा वाटतो, तेव्हा छंद सोबतीला असतो. त्यात मी निपूण नाही. पण, एकटेपणा दूर करण्यासाठी कधी रेषांच्या दुनियेत, तर कधी शब्दांच्या मैफलीत रमून जातो. त्यातूनच चित्र आणि काव्याची निर्मिती होते. त्यासाठी मी प्रसिद्धीच्या मागेही लागत नाही. स्वच्छंद हा केवळ स्वआनंदासाठीच जपत आहे. हल्ली सोशल मीडिया आल्यापासून चित्र आणि काव्य शेअर करतोय. कुणीतरी दाद देणारा असला की कलावंताच्या कलेची उन्नती होते. जशा रंगमंचावरील कलावंतांला प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या की, कलेला शाबासकी मिळते. माझ्या काव्याला तुझ्याच रसिकतेची दाद मिळत आहे. म्हणूनच अनेक वर्षांपासून खंडित काव्याची निर्मिती इतक्‍यात पुन्हा उभारून आली आहे. जणू, मरनासन्न वृक्षाला पालवी फुटावी.

आयुष्याच्या वळणावर अनेक मित्र-मैत्रिणी आलेत. काहीजण आजही संपर्कात आहेत. काही आठवणीत. पण, सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे जुने फारसे जुळून नसलेतरी नवे अप्रत्यक्ष मित्र बनले आहेत. ते, केवळ दाद देणारे आहेत. सुख दु:खात सहभागी होणारे नाहीत. त्यामुळे सोशल मीडियातील मित्रांवर माझा तितका विश्‍वास नाही. ते केवळ आभासी जग आहे. म्हणूनच मित्रांच्या जगात पाऊल ठेवताना भिंग लावत असतो. सांगायचे इतकेच की, हे जग खोटे आहे. फसविणारे आहे. स्वार्थीही आहे. म्हणूनच मित्रांची निवड ही डोळस आणि चोखदंड करतो.
मी मात्र स्वतःला सुदैवी समजतो की, तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली.  तू हसतेस तेव्हा माझ्या हसण्यात सूर मिसळतो. तेव्हा हसून आनंद मिळतो. पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण होते.
पण, इतक्यात आपल्यात वाद वाढत आहेत. मैत्री तुटेल की काय याचीच भिती वाटते, मग मीच स्वारी म्हणून नमतं घेतो. मागेही आपल्यात वाद झाला. तुझ्या मैत्रीच्या नात्यामुळे  मी गोत्यात येईन, असा माझा वाक्य होता. पण, तू पुढलं समजून घेण्यापूर्वी अबोला केला. मग, मलाच विनवणी करून माफी मागावी लागली. परवाही, अबोला सुरू झाला होता. त्यादिवशी रिप्लाय आला आणि पुढंच बोलणं सुरू झालं. नाहीतर पुन्हा मैत्री तुटते कि काय असा प्रश्न निर्माण झाला. पण मी माझी काहीही चूक नसताना तुला “सॉरी’ म्हणतो आणि तू देखील “चुकले रे मी’, म्हणत नमतं घेतेस. यातूनच मैत्रीची वीण पुन्हा घट्ट होते. कधी तू सोनू तर कधी डोमू म्हणतेस, प्रेम व्यक्त करतेय तू या शब्दातून. बरं वाटतं. मैत्रीच्या या बंधनातील अपेक्षांची जोड नसावी, असं  तू म्हणाली  होती. ते खरे आहे. अपेक्षांची पूर्ती झाली नाही की, ओझं होतं. ते पेलावत नाही. त्यापेक्षा निर्मळ मैत्री हेच आनंददायी जीवनाचे वाटसरू ठरतील.

तुझ्याकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत   
या मैत्रीची विण मैत्रीबंधात घट्ट बांधलीय,
ती नाजूक फुलासारखी कोमेजू नये,
काट्यासारखी रुतू नये,
पतंगासारखी हवेत फाटू नये,
इतकीच अपेक्षा आहे.

तुझ्यासाठी लिहावंसं वाटतं 
क्षणोक्षणी, मनोमनी
तुझी आठवण यावी
अशा मैत्रीतील सूर तू
जागोजागी, पानोपानी
तुझ्यावर लिहावं
अशा काव्यातील शब्द तू
हृदय भरून येतंय,
कंठ दाटून येतंय
या मैत्रीबंधाची वीण तू
प्रत्येक दिवशी
पसरावेत सुगंधी फूल
ती कोमल पाकळी तू

आणखी किती लिहावं. लिहायचं तर भरपूर आहे. म्हणूनच शेवट करताना माझी एक कविता ऐकवतोय.

नाहीतरी मी मरणारच आहे,
मरण्यापूर्वी लिहून घेतो
लिहता लिहता काही शब्द
तुझ्यासाठी लिहून जातो.

– देवनाथ गंडाटे 
– काल्पनिक मैत्रिणीला उद्देशून लिहलेलं पत्र.