महाराष्ट्र

पहिलं पान

  • माझ्याबद्दल

2002ची गोष्ट. मी 18 वर्षांचा असताना रामदास रायपूरे साहेबांनी मला चंद्रपूर समाचारमध्ये पहिल्यांदा नोकरी दिली. पार्टटाइम ऑफिस बाॅय म्हणून सहाशे रुपये मासिक वेतनावर कामाला ठेवलं. सकाळी काॅलेज आणि दुपारी पंचशिल चौकातील ऑफिस गाठायचो. टपाली पेपरचे गठ्ठे पाठविणे आणि सरकारी कार्यालयात पेपर वाटण्याची जबाबदारी होती. बस स्थानकावर पत्रपेटीत येणा-या प्रेसनोट घेऊन यायचो. हे काम आटोपल्यावर साहेब बातमी लिहायला लावायचे. मला माझ्या चुका दुरुस्त करून सांगायचे. मराठी विश्वकोष, थोरांची गोष्ट, पक्ष्यांची ओळख आदी पुस्तके वाचायला लावली. गणेश फेस्टिव्हलमध्ये 10 दिवस गणपतीवर चारोळी लिहण्याची परवानगी दिली. पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची संधी दिली. राजकीय सभांना जाण्याची मुभा दिली. बायलाइन बातमी देऊन प्रोत्साहित केले. यातूनच वर्षभरात मी पत्रकार म्हणून घङलो. माझ्या आयुष्याला घङविण्यासाठी त्यांनी दिलेला हात आयुष्यभर स्मरणात ठेवेन. पुढे चंद्रधून या स्थानिक दैनिकात काम केले. त्यानंतर दैनिक सकाळ मध्ये बातमीदार म्हणून कामाची संधी मिळाली. सकाळमध्ये कृषी, ग्रामीण विकास, सामाजिक, वन व पर्यावरण, ऐतिहासिक, मनोरंजन  या बिटांमध्ये लिखाण केले. ऍग्रोवन या कृषी दैनिकातही शेती कथा आणि शोध बातम्या प्रकाशित झाल्या. सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ९ वर्षे काम केल्यानंतर अलिबाग येथील कृषीवल दैनिकात वरिष्ठ उपसंपादक म्हणून १ जानेवारी ते जून २०१४ पर्यंत काम केले. त्यानंतर पुन्हा सकाळ रुजू झालो. येथे नागपूर ग्रामीणची जबाबदारी आली. यानिमित्त अनेक गावांचे  दौरे करण्याची संधी मिळाली. आता उपराजधानी नागपुरात २०१४ पासून स्थायिक आहे. जानेवारी २०१८ पासून लोकशाही वार्ता या दैनिकात मुख्य वार्ताहर म्हणून कामाला सुरुवात केली. पण, अचानक जुलै २०१९ रोजी मी बातमी लिहता लिहता थांबलो. वेबसाईट डिझाईन आणि डिजिटल मार्केटिंग हा स्वतःचा व्यवसाय सुरु केला. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेलं माझं घनदाट जंगलातील गाव आणि तिथून पत्रकारिता अरबीसमुद्राच्या खाऱ्या जलसागरापर्यंत पोहचली. बरेच अनुभव पाठीशी घेऊन नवीन मार्गक्रमण सुरु आहे. १५ एप्रिल २०२१ पासून चंद्रपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागात माहितीतज्ञ् म्हणून काम बघत आहे.

माझं गाव 

घनदाट जंगलात माझे गाव. त्यामुळं वाघाची आधीपासूनच दहशत. पश्चिमेला चार किलोमीटरवर असोला मेंढा तलाव. पूर्वेला सहा किमीवर वैनगंगा नदी. अन त्यापलीकडं गडचिरोली शहर. गावाला जाण्यासाठी तीन रस्ते. तिन्ही मार्गावर वडाचे झाड. वडाच्या पारंब्या दुरून तोरणासारख्या दिसतात. जणू  येणा-या जाणा-याचे स्वागत करण्या त्या कमानी निसर्गाने उभारल्या. वडाच्या झाडामुळच गावचे पर्यावरण संपन्न  आहे. मेहा बुजरुक या गावाची तशी वेगळी ओळख नाही. गावाच्या नावाचा कोणताही इतिहास नाही, हे गाव जेव्हा वसले तेव्हा प्रशासकीय दप्तरातून मेहा हे नाव पडले. एकाच नावाची दोन गावे असल्यास मोठ्या गावाला बुजरुक, तर छोट्या गावाला खुर्द लावतात. तसे आमच्या गावाला बुजरुक लागले. जुने आणि अशिक्षित लोकांच्या मुखातून मेहाऐवजी मिया असा उच्चार निघतो. पूर्वी अनेक कार्यक्रम पत्रिकांवर मिया असेच लिहायचे. हे गाव पूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यात होते. त्यानंतर सिंदेवाहीत. कालांतराने मुल तालुक्याचे विभाजन होऊन हे गाव सावली तालुक्यात गेले. ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली या तिन्ही शहरापासून दूर असल्याने कायम उपेक्षित राहिले. आधी हे गाव एका तलावाच्या काठी होते. आता तिथे शेती आहे. गावाच्या चारही बाजूला तलाव आहेत. पण, उन्हाळ्यात बिकट स्थिती असते. गावात विविध जाती- धर्माची लोक राहतात. मुस्मिलाची ४-५ घरे आहेत. बहुसंख्य हिंदुच्या गावात बौद्धही आहेत.

गावातील कला- संस्कृती 

गावात पूर्वी दंडार व्हायची. पुरुषच महिलांची भूमिका करायचे. परसराम दुरबुळे यांनी ही लोककला अनेक वर्ष जपली. अनेक गावकलावंत त्यांनी घडविली. मी लहान असताना संपूर्ण महिलांचा समावेश असलेला  नाटक सादर करण्यात आला.  त्यात मी एकमेव पुरुष बालकलावंत होतो. नाटकात मला काहीच बोलायचे नव्हते . म्हणून मला ती भूमिका जमली. तो पाच मिनिटांचा नाट्य प्रसंग सोडला तर आयुष्यात मी कधीच नाटकाच्या क्षेत्रात आलो नाही.
गावातील पोस्ट मास्तर वामनराव इलमलवार यांच्या मार्गदर्शनात गावातील तरुणांनी अनेक नाट्यप्रयोग केले. अरविंद निकुरे यानाही नाटकाचे वेड होते. त्यांच्या घरी नाटकाच्या तालिमी होत. रवींद्र भोयर यांना गावातली माणसं तबलजी म्हणत. ते बँकेत नोकरीला होते. परसराम सयाम यांच्या हार्मोनियमच्या साथीनं शाळेतल्या पोरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाना संगीत मिळू लागलं. भोयर आणि गणपत कोलते व अन्यकाही जणांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. गावात दरवर्षी पुण्यतिथी महोत्सव व्हायचे. निबंध, वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या. मी या स्पर्धात सहभाग घेत असे. अनेकदा प्रमाणपत्र मिळाली. माझा उत्साह वाढत गेला. भोयर यांची नागभीड येथे बदली झाली आणि या स्पर्धा बंद झाल्या. गावात नवयुवक मंडळ आणि राणी दुर्गा महिला मंडळ होते. शारदादेवीची पूजा व्हायची. गावात शंकरपट भरायचे. दिवसभर जत्रा असायची. खेळणी, आकाशपाळणा, जिलेबी, मणेरी, बांगड्याची दुकाने लागायची. वर्षभरातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असे. शाळेलाही सुटी असायची. रात्रीला नाटकाची मेजवानी. दुपारपासूनच भोंगा वाजायचा. एकाच प्रयोग…सामाजिक लावणी प्रधान संगीत… अशी नाटकाची जाहिरात व्हायची. रंगमंच परिसरात पानठेले, नड्डे, चणे, चहा, पोहा आदी दुकाने लागायची. एकदा एका नाटकाला सिनेमातील हिरोइन आली होती.  आमच्या नवीन घराचे बांधकाम नुकतेच झाले होते. तिथे प्रेमा किरण नावाची ही नटी विश्रांतीसाठी थांबली. बघण्यासाठी मोठी गर्दी झाली. लावणीच्या नाटकांना दर्दी रसिक यायचे.

गावाकडची शाळा 

गावात सातवीपर्यंत शिक्षणासाठी जि. प.ची  प्राथमिक शाळा आहे. पूर्वी कौलारू इमारत होती. दिडशे विद्यार्थांना बसण्यासाठी जागा अपुरी पडायची. मग प्रार्थना झाली की पहिली ते तिसरीची मुलं ग्रामपंचायतमध्ये वरांड्यात बसत. मुळे गुरुजी मुख्याध्यापक होते. त्यांचे ओठ नेहमी लाल असायचे, कारण त्यांच्या तोंडात नेहमीच विड्याचे  पान असे. कडक आणि शिस्तबध्द अशी ओळख होती. पाढे चुकले की फड्यावर नेवून डोके दणकन आपटायचे. त्यांच्या हातचा मारही चांगलाच सुजत असे. पहिली ते सातवीचे शिक्षण गावच्याच शाळेत झाले. त्या पुढच्या शिक्षणासाठी विहीरगावच्या विकास विद्यालयात नाव दाखल केले. हि शाळा पंचक्रोशीत शिस्तीसाठी प्रसिध्द होती. मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना गावोगावी भटकावे लागायचे. काही शिक्षक गावात आले. वसतिगृहात प्रवेश आणि अडमिशन फी माफ असे गिफ्ट देवून माझ्या सोबतच्या सातवी पास पोरांची टीसी त्यांनी नेली. नाव दाखल झाले. १०- १२ पैकी पाच पोरांना वसतिगृहात प्रवेश मिळाला. बाकीचे माझ्यासह सारे १४ किलोमीटर चा सायकल प्रवास करू लागले. सकाळी १० वाजता घरून निघायचे. सायंकाळी घरी यायचे. सोबत मोठ्या वर्गातील मुलं होती. रस्त्यात बारसागडचा डोंगर आणि दोन मोठे नाले. पावसाळ्यात नाले तुडुंब भरायचे. नाल्यावर पूल नव्हता. त्यामुळ मोठी फजिती व्हायची.  सायकल वाहून जाण्याचा प्रसंग ओढवण्याची भीती होती. शाळे जवळच्या गेवरा गावात बुधवारी बाजार भरायचा. शाळेला दुपारीच सुटी मिळायची. बाजारात मित्रासह जिलेबी खाण्याची मजा काही औरच होती.
त्याच काळात झुणका भाकर केंद्र सुरु झाले होते. शनिवारी सकाळ पाळीतील शाळा सुटल्यानंतर दोन रुपयात झुणका भाकर खायचे. गेवरा येथील उदापुरेचा खारा चिवडा लोक चवीने खायचे. छोट्याशा हॉटेलात गर्दी व्हायची.  पहिला वर्ष कसाबसा मजेशीर प्रवासात गेला. मात्र १४ किमी प्रवास करून थकलेल्या वर्ग मित्रांनी नववीत आमच्या गावा शेजारच्या आंतरगाव टोला  येथील नवभारत विद्यालयात प्रवेश घेण्याचा विचार करू लागले. पण या शाळेबद्दल आधीपासून मनात नकारात्मकता होती. पण सोबत कुणी नसल्याने मी सुद्धा नवभारत मध्ये जावू लागलो. येथे चिमूरकर गणिताचे चांगले शिक्षक होते. ते वगळता एकही शिक्षक वर्गावर येत नसे. एक महिना उलटून गेला होता. शिकवणी चा पत्ताच नव्हता. एके दिवसी मी मुख्याध्यापकाची भेट घेतली. विचारणा केली. त्यांनी आज उद्या सुरु होईल असे सांगितले. इथे येवून चूक झाल्याचा पश्चाताप झाला. पण, आम्ही एकही विद्यार्थाने विहीरगाव येथील शाळेतून नाव कमी नव्हते. त्यामुळे परत जाण्याचा मार्ग मोकळा होता. इतक्यातच विहीरगाव शाळेतील प्रचार्य नागपुरे सरांनी सर्वाना शाळेत परत येण्याचे आवाहन केले. आमच्या सर्वांच्या पालकांनी  नागपुरे सरां ची भेट घेऊन, पुन्हा याच शाळेत पाठविण्याचे ठरविले. आणि बारावीपर्यत याच शाळेत शिक्षण झाले.

बातमीच्या जगात

२००१ मध्ये अकरावीत असताना लोकमत युवा मंचतर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. सावली येथे केंद्र होते. स्पर्धत नाव नोंदणी करण्यासाठी १६ किमी सायकलने व्याहाड हे गाव गाठले. तिथे पवार शाळेत  जाक्कुलवार या शिक्षकाची भेट झाली. त्यांनी माझी नाव नोंदणी करून घेतली. या स्पर्धेसाठी मला एका मार्गदर्शकाची गरज होती. त्यांनी येथील प्रवीणभाऊ आडेपवार विद्यालयातील लिपिक रवींद्र कुडकावार (आताचे मुख्याध्यापक) यांचे नाव सुचविले. मी दुस-या दिवशी निफंद्रा येथे त्यांना भेटायला गेलो. येण्याचे कारण सांगितले. मग पाच – सहा दिवस सामान्य ज्ञान स्पर्धेत कशी प्रश्नावली असू शकते याची कल्पना दिली. स्पर्धा आटोपली. पण आमच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या. पुढे मैत्रीत रुपांतर झाले. रवींद्र कुडकावार २००१ मध्ये लोकमतला वार्ताहर म्हणून लिहायचे.  ते वार्ताहर असल्याने  त्यांना माझ्या गावाकडच्या घटना सांगत असे. मी दिलेली माहिती वृत्तपत्रात छापून यायची. त्यामुळे बातमी आणि मी असा संबंध येवू लागला. बारावीत असताना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्या गावी के. आर. चहांदे हे शिक्षक होते. त्यांनी मला पाचवी ते सातवीपर्यंत शिकविले होते. मी बारावीत असताना त्यांनीही मार्गदर्शन केले. या दोघांना माझ्याविषयी आपुलकी होती.

सामाजिक परिणाम 


गावात आनंदराव येडेवार यांचे निधन झाले. ते वयोवृद्ध होते. केस कर्तन त्यांचा व्यवसाय. गावात त्यांना माली म्हणत.  बालपणी त्यांच्याकडूनच हजामत व्हायची. त्याची दोन्ही मुलं गोंदिया जिल्ह्यात नोकरीला आहेत.  आनंदराव माल्याचे निधन झाल्याची खबर गावभर पसरली. पण चर्चा झाली ती त्यांच्या मुलांची. शिकलेल्या या मुलांनी वडिलाच्या मृत्युनंतर पारंपरिकतेला झुगारून अंत्यविधी केला. गावात उलट सुलट चर्चा झाली. या पोरांनी काय केलं, जास्त शिकलेल्या माणसांना हे शहाणपण सुचलं, असेही लोक बोलू लागले. त्यांनी मृतात्म्याला स्मशानभूमीऐवजी आपल्याच शेताच्या एका कोप-यात माती दिली. गुरुदास (पशू वैद्यकीय) आणि विनायक (शिक्षक) या भावंडानी केशवपन केले नाही (डोक्यावरचे केस न काढणे). अंत्यविधीत काकस्पर्शासारखे विधी, श्राद्ध असे धार्मिक विधी त्यांनी केले नाही. या खर्चाच्या बदल्यात त्यांनी गावच्या शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्याची घोषणा केली. या प्रकारावर जशी गावभर चर्चा होती, तशी माझ्याही घरी सारे बोलते झाले, चूक कि बरोबर यावर मत मतांतरे सुरु होती. तेव्हा मी १८ वर्षाचा असेल. पण मोठ्याच्या मध्ये बोलता येत नव्हते. रात्र ओसरली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी मला गुरुदास येडेवार यांनी त्यांच्या बहिणीच्या (विमल वामनराव इलमलवार) घरी बोलाविले. (मी एका वार्ताहरच्या मार्फतीने बातम्या देतो, असे त्यांना कुणीतरी सांगितले होते.) त्यांनी मला काल झालेल्या अंत्यविधी बद्दल तुझे मत काय, असे विचारले. मी काहीच बोललो नाही. कारण, त्यांनी जे केलं, ते करायला मोठं धाडस लागत. ते बघून मी भारावलो होतो. अंत्यविधीची बातमी छापून येईल का? असे त्यांनी विचारले. पाठवून बघू, असे मी सागितले. कारण की मी कुण्या वृत्तपत्राचा अधिकृत वार्ताहर नव्हतो. येडेवार यांनीच लिहिलेली माहिती कुडकावार सराच्या मार्फतीने ती बातमी लोकमत चंद्रपूर कार्यालयात पाठविली. तेव्हा गजानन जानभोर जिल्हा प्रतिनिधी (सध्या नागपूर लोकमत) होते. पाच दिवसांनी ती  दर्शनी भागात ठळकपणे प्रकाशित झाली. त्या दिवशी त्या बातमीचे मूल्य कळले. मी लिहिता झालो. जुने वृत्तपत्र, रद्दीत बातम्या शोधू लागलो आणि कोणती बातमी कशी लिहिली जाते याचा सराव केला. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर मी चंद्रपुरात शिक्षणासाठी गेलो. लोकमत युवा मंचला जुळल्यामुळे आनंद आंबेकर यांच्याशी ओळख झाली.

आभार 

बीए १ला असताना जुलै २००२ पासून पार्ट टाईम जॉब म्हणून पत्रकारिता क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. प्रारंभी चंद्रपुरातील दैनिक चंद्रपूर समाचारमध्ये कार्यालय प्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयात वृत्तपत्र वितरणचे काम केले. चंद्रधून (चंद्रपूर), सकाळ (चंद्रपूर), कृषीवल (अलिबाग), सकाळ (नागपूर), असा प्रवास करून आता  लोकशाही वार्ता (नागपूर) येथे कार्यरत आहे. या प्रवासात रामदासजी रायपुरे, चंद्रगुप्त रायपुरे, गजानन जानभोर, श्रीपाद अपराजित, देवेंद्र गावंडे, शैलेश पांडे, सुनील कुहीकर, भूपेंद्र गणवीर, प्रमोद काळबांडे, भास्कर लोंढे, आनंद आंबेकर, संजय तुमराम, प्रमोद काकडे, गजानन ताजने यांच्या सारख्या अनुभवी पत्रकारांचे मार्गदर्शन लाभले. पत्रकारिता क्षेत्रातील बरेच अनुभव पाठीशी घेऊन नव्या माध्यमांच्या युगात आणखी शिकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

29 thoughts on “पहिलं पान”

  1. ॐ नमस्कार आपण पत्रकार आहात वसुधालय वाचून वर्तमान पत्र कोणते हि छापून आणावे तसे जळगाव वर्तमान पत्र आसमत म्हणून किशोर कुलकर्णी यांनी छापून आणले आहे आपण कोणता वर्तमान पत्र येथे आहात !नमस्कार

    Like

  2. ॐ नमस्कार दिनांक १४ डिसेंबर २०१४ वाढ दिवस शुभेच्छा !ब्लॉगवाल्या आजीबाई मनातल तरुण भारत मध्ये किशोर कुलकर्णी यांनी वसुधालय वसुधा चिवटे छापून आणल आहे आपण सकाळ मध्ये छापून आणावे

    Like

  3. तुमच्या नेतृत्वात् काम करण्याची संधी मिळाली होती. पण मी ती गमवाली आहे. दै सकाळ joined केल्यापासून माझ्या कम्पनीतील गढुल वातावर्णामुळे अस्वथ होतो……बरे असो तुमच्या पुढील वाटचालिकारिता मनःपूर्वक शुभेच्छा!!!

    Like

  4. देवनाथजी आपन प्रयत्नाची पराकाष्टा केली व सर्व बाबी पडताडून नावरूपात आलात तसेच परिस्थीतीसी जुडवून निर्नायक भुमीका घेतल्या आपन अभीनंदनास पात्र आहात!!!आपल्याही बाबतीत अशा घडल्या परंतू वाव मिळाला नाही परिस्थीती नुसार परिवर्तन होत गेले.आपन ह्या बाबतीचे जानकार आहात पणपरिवर्तन हे संसाराचे नियम आहेत.आपनास हार्दीक शुभेच्छा!!!

    Like

  5. छान ! आपण वेवास्थेच्या विरोधात विरुद्ध दिशेने वाटचाल करणार्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आपल्या लिखाणातून उमटले ,देशाला तुमच्या सारख्या पत्रकारांची गरज आहे . आणि या सामाजिक गरजेसाठी मी तुमच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी पाहिजे तो लढा देण्यास व पाहिजे ती गरज पूर्ण करण्यास तयार आहे .

    Like

  6. ग्रामीण क्षेत्रातुन पुढे येणे ही खुप मोठी संधी असते, आणि त्या संधिचे तुम्ही सोने केले.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    Liked by 1 person

  7. छान देवनाथभाऊ. असेच लिखाणाच्या माध्यमातून पुढे जाआम्हालाही गर्वाने सांगता येईल की माझा मित्र चांगला वृत्तांकन करतो. नवीन ब्लॉगसाठी शुभेच्छा

    Like

  8. खूप आनंद झाला आपलं पाहिलं पान वाचून आपल्यासोबत मैत्री झाल्यापासून आपल्या मैत्रीचे दिवस आपण इको प्रो या संस्थेमध्ये सोबत केलेले काम हे जुने दिवस आत्ताही आठवले की जुन्या आठवणी ताज्या होतात. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…💐💐

    Like

  9. उत्तम प्रकारे तुम्ही ब्लॉग लेखन केलेलं आहे , तुमच्या सर्व भूतकाळातील आठवणींना उजाळा या ब्लॉग द्वारे आमच्या पर्यंत पोहचवला. तुम्ही पत्रकारितेची सुरुवात कशी केली ते याद्वारे शिकायला मिळते , आणि भावी पत्रकारांनि कश्या प्रकारे आपल्या पत्रकारितेची सुरुवात करावी ते या ब्लॉगच्या माध्यमातून शिकायला मिळते .

    Liked by 1 person

Leave a reply to अंकित मालखेडे उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog | Webpage